Site icon Youth Ki Awaaz

विचार तर कराल?

आज काय म्हणे वटपौर्णिमा! पतिव्रता स्त्रियांचा हा सण. त्याचा थोडा आढावा घेऊया.

सावित्री ही अश्वपती राजाची एकुलती एक मुलगी. विवाहयोग्य झाल्यावर तिला पती निवडण्याचा अधिकार अश्वपतीने दिला. यावरून त्या काळात स्त्री स्वातंत्र्य आणि सन्मान होता, ही बाब लक्षात येते. तिने एक देखणा आणि गरीब सत्यवान निवडला. विवाह ठरल्यानंतर नारद मुनींनी सावित्रीचे मन बदलण्याचा प्रयत्न केला. सत्यवान अल्पायुषी आहे, एक वर्ष त्याचे आयुष्य आहे, तू लग्न करू नकोस, असे समजावले. पण ती आपल्या विचारापासून ढळली नाही. त्यांचे लग्न झाले. त्यानंतर एका वर्षाने सत्यवान एका झाडाची लाकडे तोडता तोडता खाली कोसळला. यमाने आपला फास सत्यवानाच्या गळ्याभोवती आवळला. सत्यवान मृत्यू पावला. यम देवाला सत्यवानाला सोबत घेऊन जाताना बघून सावित्री पण त्याच्या मागे धाऊ लागली. यमाने मागे येण्यास नकार दिला तरीसुद्धा सावित्री पतिव्रता होती म्हणून मागे धावली. मग यमाने तिला तीन वरदान दिले आणि तिची पतीवरची निष्ठा पाहून पतीचे प्राण परत केले. सत्यवानाचा देह वडाच्या झाडाखाली पडलेला होता म्हणून सावित्रीने त्या वडाची पूजा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर वटसावित्री पौर्णिमा साजरी व्हायला लागली.

असं हे सगळं थोतांड. मग उपवास धरणे, वडाला 108 प्रदक्षिणा घालणे, सजणे इत्यादी ह्याला काहीच अर्थ नाही. सावित्री आणि सत्यवान कोणत्या युगात होऊन गेले हे कुठेच आढळत नाही. ठीक आहे, सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, प्रेमापोटी. पण आज कलियुगात खरंच सत्यवान येणार आहे का सावित्रीचे प्राण वाचवायला? असं होऊ नये पण आजच्या सावित्रीवर जर काही संकट आलं तर सत्यवानाला बसल्या जागी साक्षात्कार व्हायला पाहिजे ना की आपली सावित्री संकटात आहे म्हणून? किंवा सावित्रीला सुद्धा घर बसल्या समजायला पाहिजे की आपला सत्यवान संकटात आहे म्हणून.

खरी सावित्री होती जोतिबांची ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. पतिव्रता च खरं उदाहरण म्हणजे सवित्रीआई. नवऱ्यासोबत दगडगोटे झेलनारी खरी पतिव्रता. एक स्त्री किती विवेकवादी, धाडसी, वैचारिक आणि संघर्षमय असते हे सांगायची गरज नाही. पण हीच स्त्री जेव्हा अंधश्रद्धेने झाडाला दोरा गुंडाळते तेव्हा सवित्रिआईने ह्याचसाठी एवढा अट्टाहास केला होता का असा प्रश्न नक्की पडतो!

स्त्रियांना गुलाम बनविणाऱ्या धार्मिक रूढी आणि व्रतवैकल्ये: स्त्रीला पुरुषाच्या आधीन करणं हे सर्वच धर्मांचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट असावं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे धार्मिक विधी, कर्मकांड आणि व्रतवैकल्ये त्यांच्यावर लादण्यात आली जेणेकरून स्त्रिया धर्माचरणामध्ये (याला आध्यात्मिकता असं गोंडस नाव दिलं जातं) गढून जातील आणि कुटुंबाचा कारभार, तसेच सार्वजनिक जीवनातील घडामोडींपासून त्या अलिप्त राहतील. आणि जर ही गोष्ट आजच्या स्त्रीला अवगत होत नसेल तर so-called प्रगतशील स्त्रीच्या शिक्षणाचा उपयोग काय?

माणसाला आपली बुद्धी गहाण ठेवायला उद्युक्त करणे हा अंधश्रद्धेचा खरा धोका आहे. त्यातून शोषण करणाऱ्यांना रान मोकळं सापडतं. आणि स्त्रियांच्या बाबतीत तर स्वतःची बुद्धी वापरणे हा जणू गुन्हाच मानला जात असल्याने त्यांचे शोषण फारच सुलभ असते. परंपरागत धार्मिक-सांस्कृतिक संस्कारातून, व्रतेवैकल्ये आणि कर्मकांडे मोठ्या कसोशीने पाळणे म्हणजे आपली महान संस्कृती जपणे हे जसे केवळ स्त्रियांचेच कर्तव्य मानले जाते तसेच त्यामागच्या भाकडकथा खऱ्या मानून त्या पुढच्या पिढीपर्यंत पोचविणे हेही स्त्रियांचे कर्तव्यच आहे असे स्त्रियाही मानतात. कोणत्या पुराणात पुरुषांवर संस्कृती जपायची जबाबदारी आहे?

संस्कृती जतन करण्याची जबाबदारी सर्वस्वी स्त्रियांवर सोपविलेली असते. कधी विचार केलाय का ही जबाबदारी स्त्रियांवरच का? तर स्त्रियांनीच याकडे दुर्लक्ष केलं तर परंपरागत कुटुंबपद्धतीच धोक्यात येईल.

जुन्या रुढी आणि परंपरा पाळा, पण अंधश्रद्धेची पट्टी डोळ्यावरून काढून! प्रत्येक गोष्टी मागचं कार्यकारणभाव आज प्रत्येक स्त्रीने ओळखलाच पाहिजे. तर तुमच्या शिक्षणाचा उपयोग होईल, तर ज्ञानज्योतीच्या ह्या परिश्रमाचा उपयोग होईल.

आजच्या प्रत्येक स्त्रीने तिच्या नवऱ्याला ठामपणे सांगितलं पाहिजे की मी उपवास धरते तू साथ जन्म भेटावा म्हणून! मग माझ्या सोबत तू पण उपवास धर, तरच मी पण धरणार! तुला नाही का मी पाहिजे पुढचे साथ जन्म? हे one-sided love कशासाठी? आणि प्रत्येक पुरुषाने देखील आपल्या पत्नीला सांगितलं पाहिजे की सोबत उपवास धरू! संसार दोघांचा आहे मग दोघे पण आनंदाने करू!

वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास धरतात, हाच पती पुढचे साथ जन्म मिळावा म्हणून! मग काय फक्त पत्नीलाच आहे तो पती पाहिजे असतो साथ जन्म? पतीला नाही का पाहिजे तीच पत्नी पुढचे साथ जन्म? आजच्या युगात पण पतिव्रताचं का? पत्नीव्रता का नाही? आजच्या वाढत्या divorce rate मुळे हा जन्मच सोबत आहोत की नाही सांगता येत नाही, तर पुढच्या साथ जन्मांची शाश्वती कशी काय देऊ शकतो आपण?

शेवटी काय हो,

रुढी परंपरा खाली रोपली जाते, ज्ञानाची वाढ ही खुंटवते. मर्यादेपेक्षा जास्त असलेली श्रद्धा अन सत्याला नाकारते ती अंधश्रद्धा!

-दिव्या विजय देशमुख!

माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय, छ.संभाजीनगर.

मु.पो. रांजणगाव देशमुख, ता. कोपरगाव, जिल्हा. अहमदनगर.

Exit mobile version