Site icon Youth Ki Awaaz

लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी मालेगाव सज्ज

संयोगिता ढमढेरे

मालेगावच्या आरोग्य विभागात येत्या ३ मार्चला होणाऱ्या पोलियो अभियानाचं नियोजनाची जोरजोरात तयारी चालू होती. वैद्यकीय अधिकारी आणि नर्सेस त्याचीच चर्चा करत होत्या. २०१० साली इथे पोलीयोच्या चार केसेस मिळाल्या होत्या. नियमित लसीकरणाच्या बाबतीतही इथले अनेक विभाग संवेदनशील वर्गात मोडतात. त्यामुळे प्रत्येक लसीकरण अभियान यशस्वी करण्यासाठी इथे विशेष प्रयत्न केले जातात. मालेगाव महानगर पालिकेच्या प्रजनन आणि बाल वैद्यकीय अधिकारी डॉ. अलका भावसार यांचं नियोजन, आरोग्य केंद्राच्या पातळीवर त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि अंगणवाडी कर्मचारी, स्थानिक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते यांच्या सहभागाने लसीकरणाचे प्रमाण सुधारत आहे. 

डॉ. अलका भावसार यांनी २०२१ साली प्रजनन आणि बाल वैद्यक विभागाच्या प्रभार स्वीकारला. सर्वप्रथम त्यांनी आरोग्य केंद्राच्या सीमा स्पष्ट केल्या. महानगरपालिकेची इथे ५ मुख्य विभाग आहेत त्यात १४ नागरी आरोग्य केंद्र आहेत. या केंद्रांच्या अखत्यारीत एका महिन्यात ५४ आणि वर्षभरात ६३० नियमित लसीकरण सत्र असतात. केंद्र सरकारचे इंद्रधनुष, मालेगाव महानगर पालिकेतर्फे ‘मिशन महफूज’ ही लसीकरणाची विशेष अभियानही चालवली जातात. या मोहिमेदरम्यान जन्मापासून सात वर्ष वयोगटातील मुलांना नऊ आजारांपासून वाचवण्यासाठी BCG, पोलिओ, हिपॅटायटीस बी, पेंटाव्हॅलेंट, FIPV, RVV, PCV आणि MR या लसीची विशेष सत्र आयोजित केली जातात. १० ते १२ हजार लोकसंख्येचा एका विभागाला एका नर्सची नेमणूक केली आहे. नियमित लसीकरण सत्र पक्की केली गेली. प्रत्येक सत्र आणि त्याचा भौगोलिक क्षेत्र पक्कं करण्यात आलं. लसीकरणाच्या तीन वेगवेगळ्या रजिस्टर मध्ये नोंदी केल्या जातात. मुलं आणि गरोदर स्त्रियांची नोंद होते. रजिस्टर मधल्या नोंदीमुळे कोणाला लस देण्याची वेळ आली आहे, लस घेतलेल्यांची नोंद आणि न घेतल्याचं कारण समजतं, पाठपुरावा करायचा ते कळत. एका रजिस्टरमध्ये जोडप्यांची नोंदणी होते. दुसर्‍या रजिस्टर मध्ये १० वर्षापर्यंतच्या मुलांच्या नोंदी होतात. एप्रिल २२ ते मार्च २३ या कालावधीत सुमारे ७ वर्षापर्यंत १४ हजार मुलांना लसीकरण करण्याचं लक्ष्य होतं त्यापैकी साधारण ६० टक्क्यांपर्यंत पोहोचण्यात मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याला यश आलं आहे. हे प्रयत्न कौतुकास्पद आहेतच परंतु अजून ९५ टक्के पूर्ण करण्याचा महत्वपूर्ण टप्पा गाठायचा आहे.

अज्ञान, अनास्था आणि विरोध यामुळे डी पी टी, पेंटा लस घेण्याचं प्रमाण इथे खूप कमी आहे. त्यामुळे संपूर्ण लसीकरणाचं लक्ष्य पूर्ण होऊ शकत नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांना अस्वीकार, नकार, त्यांच्याशी कसा संवाद साधायचा यांचं प्रशिक्षण दिलं जातं. महिलांच्या, मासिक सभा घेतल्या जातात. 

“ मी पूर्वी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केलं असल्याने आरोग्य केंद्र पातळीवर कोणत्या समस्या येतात याची मला कल्पना आहे. ते लक्षात घेऊन मी काही बदल केले. लसीकरण सत्राची माहिती जाहीर करण्यासाठी वेगळा निधी ठेवला. लसीकरण सत्राची माहिती पूर्ण क्षेत्रात ध्वनिक्षेपकावरून दिली जाते.” डॉ. भावसार यांनी सांगितलं.

“पूर्ण लसीकरणाचा टक्का वाढल्यास एएनएमला उत्तेजनार्थ काही रक्कम दिली जाते. लसीकरण केल्यानंतर मुलांना काही रीएक्शन आली का हे पहाणं, त्यांचा पाठपुरावा करणं खूप आवश्यक आहे. लस दिल्यानंतरही मुलांची काळजी घेतली जाते हा विश्वास संपादन केल्यानंतरच गुणवत्ता सुधारणा होऊ शकते. यासाठी माहिती शिक्षण संवाद (आय इ सी) देणारी गाडी, पथनाट्य, आदी दृकश्राव्य माध्यमातून माहिती दिली जाते. आणि लसीकरणात सुधारणा करणाऱ्याना काही बक्षीसही दिली जातात.” त्या म्हणाल्या.

“शाळा, मशीद इथे माहिती सांगून खाजगी डॉक्टर, समाजसेवक, स्थानिक नेते सर्वांशी संवाद साधून लसीकरण सत्र आयोजित केल्यानंतर २० – ३० टक्के लसीकरण असलेल्या क्षेत्रात आज ५५ टक्के लसीकरण होत आहे. योग्य नोंदी ठेवल्याने गेल्या काही वर्षातले आकडे पाहता येतात. तसेच वेळ, जागा, सगळ्यांची नोंद आणि कोणाचा पाठपुरवा करण्याची गरज आहे हेही ओळखता येते.” डॉ. भावसार म्हणाल्या.

अजूनही काही अडचणींवर मात करायची आहे, “ कुटुंबातले पुरुष हेच आजही सगळे निर्णय घेतात. पण ते उपलब्ध नसतात किंवा नाराज असतात. त्याच्याबरोबर रात्रीच्या मिटिंग घेण्यासाठी पुरुष संवादक असतील तर त्यांच्याशी संवाद साधण, लसीकरणाच महत्व पटवून देणं शक्य होईल” अशी डॉ भावसार यांना आशा आहे.

शहरातील पुरुषांबरोबर संवाद साधण्यासाठी पुरुष आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक होईपर्यंत ते काम थांबलेलं नाही. स्थानिक सामजिक कार्यकर्ते हे काम नेटाने पार पाडत आहेत. खडी मशीन मालक ते रिक्षा, अम्ब्युलन्स ड्रायव्हर, यु ट्यूब वाहिनी चालवणारे, छोटे व्यावसायिक ते यंत्रमाग कामगार असे अनेक समाजसेवक लसीकरणाबाबत जाणीवजागृती करून लोकांचं मन वळवण्यात यशस्वी होत आहेत.

मुस्लीम उन्नती सेवा फौंडेशनचे अध्यक्ष गुलाम भाई म्हणाले “कोणी ऐकत नसेल तर त्यांना समजवायला जातो. गरीब लोकांना दवाखान्यात घेऊन जातो. त्यांच्या उपचाराची तरतूद करतो. अशिक्षित लोक आरोग्य केंद्रात जात नाहीत. काही अफवा ऐकल्यामुळे हे लोक आरोग्य कर्मचार्‍याशी भांडू लागतात, त्यांची भांडण आम्ही सोडवतो.”

मुस्लीम उन्नती सेवा फौंडेशनचे सदस्य 

“मुलांच्या लसीकरणाला नकार देण्याची लोकांची वेगवेगळी कारणं असतात. वस्तीत साफसफाई नाही. आंगणवाडी नाही. डास घालवण्यासाठी धूर, औषधाचा शिडकाव होत नाही यामुळे रागावलेले लोक लसीकरणाला विरोध करतात.” अझीझभाईनी सांगितलं.

“मुलांना लस देताना आम्ही त्यांच्या आरोग्याची हमी देतो. आम्ही जशी मदत करतो. तसेच शाळा, वॉर्ड, मोहल्ल्यात मिटिंग व्हायला हव्यात. सरकारी रुग्णालयात सर्व उपचार मिळायला हवेत. गटारं साफ व्हायला हवीत.” अशी मोहम्मद इस्माईलभाई यांनी मागणी केली.

“ बरेच लोकांना वाटतं लसीकरण केल्याने कमजोरी येते. आशासेविकांना आमच्या घरी बोलावून आमच्या मुलांचं लसीकरण करून घेतो ते पाहून इतर लोक पण त्यांच्या मुलांना लस देतात.” मुस्लीम उन्नती सेवा फौंडेशनचे कार्यकर्ते अपघात, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर उपचार स्वच्छता आदी कामंही करतात.

ज्या ज्या क्षेत्रात आंगणवाड्या आहेत तिथे अंगणवाडी सेविकाही लसीकरणाच्या कामात सक्रीय सहभाग घेतात“आमच्या भागातले लोक स्थलांतरित आणि अत्यंत गरीब आहेत. लसीकरण ही इसाई साजीश आहे. वेळेच्या अगोदर का प्रतिकारशक्ती कशासाठी हवी. आजार व्हायच्या आधीच प्रतिबंध कसा करणार असे प्रश्न विचारतात.” आझमी नगरच्या सलमा बानो अब्दुल वदुद सांगत होत्या.

सलमा बानो 

मेहरुन्निसा मोहम्मद मुस्तफा या राजानगर इथे गेले ३५ वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. अंगणवाडी जिथे आहे त्याच वस्तीत रहात असल्याने प्रत्येक घर आणि त्यातली मुलं त्यांना माहीत आहेत. सगळे त्यांचं ऐकतात त्यामुळे त्यांच्या भागात एकही मुल लसीकरणापासून वंचित नाही. “नवीन कुटुंब आलं की मी त्यांना लसीकरणाची माहिती देते, समजावते. माझी आजवर तीनदा प्राथमिक आणि उजळणी प्रशिक्षण झाली आहेत.” त्या म्हणाल्या.

मेहरुन्निसा मोहम्मद मुस्तफा

इस्लामपुऱ्यातील सलमा अजीज उर रहमान या लग्न करून आल्या त्या घरातच अंगणवाडी असल्याने तेव्हापासूनच विना मोबदला काम करण्याचा त्यांना अनुभव होता. आज १५ वर्ष त्या सेविका म्हणून काम करत आहेत. “आमच्या वस्तीत ४-५ घरी नकार आहे ते नकारच आहे. आजच माझ्या वस्तीत सकाळी एक डिलिव्हरी झाली. लगेच तिला सुरुवातीचे डोस दिले. असेच खाजगी रुग्णालयातही हे डोस दिले तर लसीकरण पूर्ण होण्यास खूप मोठा हातभार लागेल” असं त्यांना आणि इतरानाही वाटतं.

सलमा अजीज

सुरेखा जगताप, आयशानगर इथे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करतात. त्या लसीकरणाच्या दिवशी घरोघरी जाऊन माहिती देतात. “एकही मूल लसीकरणाशिवाय राहू नये यासाठी बाळाची आई आणि सासू दोघींना बोलावून मिटिंग घेतो. नवीन जोडप्यांची नोंद ठेवतो. अंगणवाडीत पहिल्या मुलाला गादी, मच्छरदाणी, झबल, टोपडं, नेलकटर, खेळणी, थर्मामीटर, डायपर, आईला कान बांधायची पट्टी असं सामान असलेली बाळाच्या सामानाची पेटी देतो. गरोदर माता, स्तनदा माता आणि मुलांना आम्ही आहार पण देतो. मुलांना फॉलिक ऍसिड, जंतनाशक गोळ्या देतो.” त्या म्हणाल्या. अशा योजनांमुळेही लोकांचा विश्वास बसतो आणि ते लसीकरणाच्या सेवा आनंदाने घेतात.

सुरेखा जगताप

Exit mobile version