Site icon Youth Ki Awaaz

दाम्पत्याने बालसंगोपणासाठी वाहून घेतल्याने वंचितांची मुले झाली शिक्षित

सेवाश्रम प्रकल्पातून 13 वर्षांपासून होतेय तमाशा कलावंतांच्या मुलांचे संगोपण

सुशील देशमुख

रक्ताची नाती दूरावली जात असताना समाजात दुसर्‍या एका कोपर्‍यात असे काही घडत असते की, ते अनुभवले की, माणूसकी अन् आपुलकीतून किती महान कार्य करता येते याची प्रचिती येते. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात शिरुरकासार हा दुष्काळग्रस्त भागात येणारा तालुका. या ग्रामीण तालुक्यातील डोंगरपायथ्याशी वसलेल्या ब्रह्मनाथ येळंब छोट्याशा गावालगत एका दाम्पत्याने सेवाभाव वृत्तीतून वंचितांच्या मुलांच्या व्यथा कमी करण्यासाठी आणि समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून काम सुरु केले. थोर समाजसेवक स्व.बाबा आमटे यांच्या समर्पित सेवा कार्याचा आदर्श त्यांच्यासमोर होता. तमाशा कलावंत, जे की, पाल ठोकून कोस-दरकोस मुक्काम करत आपला उदरनिर्वाह चालवणार्‍या आणि पालकत्वाची अन् संगोपणाची जबाबदारी पुर्ण न करु शकणार्‍या मुलांच्या पालन,पोेषण संगोपणासह शिक्षण अन् पुर्नवसनाचे काम या दाम्पत्याने निर्मिती प्रतिष्ठाच्या ‘सेवाश्रम’या प्रकल्पाच्या माध्यमातून हाती घेतले.ही सर्व काही किमया करुन दाखवणार्‍या दाम्पत्याचे नाव म्हणजे श्री सुरेश राजहंस व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मयुरी राजहंस.

2011 पासून लोकसहभागातून उभा राहिलेल्या ‘सेवाश्रम’ या प्रकल्पाच्या संघर्षाचा हा प्रवास वंचितांच्या मुलांच्या जीवनात मात्र आशेचा किरण तर ठरलाच पण त्यांचे काळवंडून गेलेले जीवन सोनेरी करणारा ठरला आहे. सुरेश हे स्वत: बी.एड.अभ्यासक्रम पूर्ण करुन शिक्षक म्हणून तीन वर्ष ग्रामीण भागात काम करत होते. या दरम्यान त्यांना जे की,आजूबाजूला प्रतिकूलता दिसली. त्यातून त्यांनी तमाशा कलावंत जे की, महाराष्ट्राच्या विविध भागात आपली उपजिविका भागवणार्‍या मुलांच्या वाट्याला येणार्‍या समस्या जाणून घेण्यासाठी 2011 मध्ये एक सर्वे हाती घेतला. या सर्वेक्षणातून त्यांना या घटकांच्या एका ना अनेक समस्या दिसून आल्या.साधारण 15 ऑगस्टच्या नंतर तमाशा फड मालकाकडून उचल घेतल्यानंतर करार सुरू होतात. सप्टेंबरमध्ये तालमी बसवल्या जातात, वगनाट्य रचले जाते. त्यानंतर ऑक्टोबरपासून पुढे मे महिन्यापर्यंत हे तमाशा कलावंत आपली कला सादर करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी काम करत राहतात. अशावेळी तमाशा कलावंतांच्या मुलांच्या काळजी व संरक्षणाचा कळीचा मुद्दा उपस्थित झालेला असतो.कारण ही मुले त्यांचे आई-वडील सांभाळताना दिसत नाहीत हे सर्वेमध्येही सुरेश राजहंस यांना दिसून आले. तमाशा फड मालकाला ही मुले त्यांच्या आईंसोबत नको असतात. मग अशी मुले प्रवाहाबाहेर जाऊन मिळेल ते काम करतात. ‘तमासगीर’ म्हणून समाजात होत असलेली अवहेलना यामुळे या कलावंतांच्या मुलांच्या शिक्षण आणि एकंदरीत जगण्याचा प्रश्न निर्माण होता. त्यांच्याकडे चांगल्या नजरेने पाहिले जात नाही. एखादा कलावंत तमाशामधून आपली कला सादर करत असला तरी ‘तो तमाशात पळून गेला’ असे सांगत त्यांना हिणवण्याचे प्रकार पाहायला मिळते.

तमाशा कलावंत कुटूंबाच्या समस्या जाणून व्यथित झाले अन् बालकांच्या हक्कांसाठी सुरु केले निष्ठेने काम

तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी सर्वेक्षण करत असताना अहमदनगर, बीड, जालना या जिल्ह्यात जावून त्यांच्या व्यथा जाणून घेत राजहंस यांनी काही कलावंतांना बोलते केले. त्यावेळी त्यांची परिस्थिती समोर आली. या दरम्यान कलावंतांशी निर्माण झालेल्या आपुलकीच्या भावनेतून कलावंतांनी त्यांची व इतर कलांवतांची अशी एकूण 10 मुले ‘सेवाश्रम’ कडे सोपवली. तमाशा कलावंत वर्षातील 8 महिने स्थलांतरीत होत असतात. यामुळे ही मुले शैक्षणिक प्रवाहात रहात नाहीत. पालक तमाशासाठी बाहेर पडल्यानंतर ही मुले भंगार वेचणे, गारीगार विकणे, ढाब्यावर कामाला जाणे अशी कामे करतात किंवा गुन्हेगारीकडे वळतात. या बाबी सर्व्हेक्षणात निदर्शनास आल्यानंतर सेवाश्रमात या मुलांसाठी काम सुरु करण्यात आले. आज ही मुले-मुली पुर्णवेळ शैक्षणिक प्रवाहात आले आहेत. वसतीगृहात त्यांच्यासाठी अधिकचे वर्ग घेऊन त्यांना इतर मुलांप्रमाणे शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांची तयारी करुन घेऊन या मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या बौध्दीक क्षमतेनुसार शिक्षण दिले जात आहे. 

बालकांच्या काळजी व संरक्षणाचा प्रश्न सुटला

राज्यात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांसाडी महाराष्ट्रात विविध ठिकाणी काम चालते; मात्र मात्र तमाशा कलावंतांच्या मुलासाठी काम करणारी कोणतीही संस्था राज्यात नव्हती. हे कलावंत लोक उपजीविकेसाठी तमाशाच्या फडात काम करतात. यामध्ये संगीत बारीचा तमाशाचा फड आणि ढोलकीचा तमाशा फड असे दोन प्रकार आहेत. ढोलकीच्या फडांमध्ये जे कलावंत काम करतात त्यांच्या मुलांसाठी ‘सेवाश्रम’ या संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले गेले. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागातील एकही गाव असे नाही की, या ठिकाणी आयोजित केल्या जाणार्‍या यात्रेत ढोलकीच्या तमाशाचा फड नसतो.तमाशा ही लोककला जगवण्यासाठी सरकारकडून केवळ तमाशा फड मालकाला अनुदान दिले जाते कलावंतांकडे मात्र दुर्लक्ष होते. राज्यात आजही जवळपास 450 फड कार्यरत आहेत.यातील काही मुलांच्या काळजी व संरक्षणाचा प्रश्न ‘सेवाश्रम’च्या कार्यामुळे मार्गी लागला आहे.

सेवाश्रमाजवळच सुरु केले आनंदनिकेतन विद्यामंदिर

सुरुवातीला या मुलांना जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेशित केले मात्र इतर काही मुले त्यांची अवहेलना करताना दिसून आले. हे सारे लक्षात घेऊन 2012 मध्ये सेवाश्रमने शिक्षण विभागाच्या परवानगीने स्वतःची शाळा सुरू केली. आनंदनिकेतन विद्यामंदिर या नावाने ही शाळा सुरू झाली. या ठिकाणी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू केले गेले. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तीन शिक्षक कार्यरत आहेत. त्यांना मानधन तत्वावर नियुक्ती दिली गेली आहे.ज्या उद्देशाने या मुलांच्या पालन,पोषणासह, संगोपण अन् शिक्षणाचे ध्येय समोर ठेवले होते, ते काही अंशी का होईना पण लोकसहभागातून पुर्णत्वाकडे जात असल्याचा आनंद वाटतो हे सांगताना सुरेश व मयुरी राजहंस यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे भाव दिसले.

पाच मुले घेतायेत दर्जेदार शिक्षण, दोन कन्यांचे विवाहही लावले

सेवाश्रम प्रकल्पामुळे वंचितांच्या मुलांना दिशा मिळाली आहे. या प्रकल्पातील 1 मुलगा डीएड हा शिक्षक होण्यासाठीचा अभ्यासक्रम पूर्ण करत असून दुसरा 1 विद्यार्थी अहमदनगर येथे अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेतो आहे. अन्य 2 विद्यार्थीनी बीएससी नर्सिंगसाठी पुणे येथे शिक्षण घेत असून अन्य 1 विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर येथे आयटीआयचे शिक्षण पूर्ण करुन त्याला एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरीही मिळाली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दालन उपलब्ध करून देण्याबरोबरच सेवाश्रम प्रकल्पात वाढलेल्या दोन मुलींचे लग्न लावून देण्याचे पुण्याचे कामही या संस्थेने केले. सन 2018 मध्ये एक व सन 2020 मध्ये दुसर्‍या मुलीचा विवाह संपन्न झाला.

कुटूंब,नातेसंबंध रुजवतानाच चिमुकल्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी राजहंस झाले स्थानिक पालक

सेवाश्रम प्रकल्पात मुलांना आणल्यानंतरचा प्रवासही संघर्षाचा राहिला. किमान 6-7 वर्षे वयाचे मूल या प्रकल्पात प्रवेशित केल्यानंतर त्यांना भाषा ज्ञान देणे याबरोबरच त्यांचे कुटुंब म्हणून भूमिका बजावावी लागते. याबरोबरच हा मामा, तो काका, ती मावशी, ही ताई, ती काकू ते काका अशी नात्यांची गुंफण घालत त्यांना कुटुंब व्यवस्थेचे एक प्रकारे शिक्षणही दिले जाते. या कुटुंबात मुलांच्या नावापुढे केवळ आईचे नाव लावले जाते.अशावेळी त्या महिला स्वतःचे नाव लावा किंवा माझ्या वडिलांचे नाव लावा असे सांगतात. असे असले तरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये या विद्यार्थ्यांना प्रवेशित करताना त्यांच्या वयाचा दाखला म्हणून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्याबरोबरच स्थानिक पालक म्हणून शंभर रुपयांचे शपथपत्र शिक्षण विभागाला द्यावे लागते तेव्हा कुठे त्यांना वयानुसार त्या त्या वर्गात प्रवेश दिला जातो. सुरेश राजहंस यांनी स्थानिक पालक हे शपथपत्र दिले.त्यामुळे अनेक मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे.सुरुवातीला यासाठी खूप अडचणी आल्या मात्र आता 13 वर्षापासूनचा अनुभव पाठीशी आहे. त्यामुळे ही मुले या ठिकाणी आल्यानंतर शिक्षणाच्या प्रवाहात येत असल्याचे राजहंस यांनी सांगितले.

संघर्ष होताच…सारे काही अनुभवातून घडत गेले

महत्वाचे म्हणजे 28 मे 2011 रोजी राजहंस यांचा विवाह झाला त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजेच 5 जून 2011 रोजी तमासगिरांच्या 10 मुलांना घेऊन सेवाश्रम हा प्रकल्प सुरू केला आणि त्यांचे पालकत्व सुरेश राजहंस यांनी स्वीकारले. सुरुवातीला अगदी 13 बाय 25 इतक्याच जागेत पत्र्याच्या शेडमध्ये हा प्रकल्प सुरू केला. पत्नी मयुरी ही शहरी वातावरणात वाढलेली; तरीही ती इथे रमली. तिला चूलही पेटवता येत नव्हती. सोबत असलेली मुले चूल पेटवून देत. नंतर सारे काही अनुभवातून घडत गेले आणि लोकसहभागातून सुरळीतही…हा प्रकल्प चालवताना पैशाची आवश्यकता तर वेळोवेळी लागत होती. सुरुवातीला अनेकांच्या दारात देणग्यांसाठी धाव घेतली पण कोरड्या तत्त्वज्ञानाशिवाय फारसे मार्गदर्शन कोणी केले नाही. नंतर मात्र समाजातील अनेक दानशूर पाठीशी उभा राहिले. त्यांनी या ठिकाणी बांधकामासाठी सहकार्य केले. विद्यार्थ्यांसाठी ब्लँकेट वाटप, सिमेंट वाळू लोखंड, किराण्यापासून दुधापर्यंतच्या वस्तू लोकसहभागातून या ठिकाणी येत गेल्या. यातूनच जून 2022 मध्ये सेवाश्रमचे दुसरे सेंटर छत्रपती संभाजीनगर येथे सुरू केले.

लोककला जिवंत ठेवली पण स्वत:च्या अस्तित्वाचे काय?

तमाशा कलावंतांना स्वतःचे आधार कार्ड, जात प्रमाणपत्रही नसते. त्यांचा पत्ताही कायमचा नसतो अशावेळी त्यांच्या बालकांच्या संगोपणाचा प्रश्न निर्माण होता. ‘मुलगी झाली तर कमाईचे साधन मुलगा झाला तर मिळेल तो काम करेल’ अशी एकंदर विचारधारा या कुटुंबांमध्ये दिसून येत असल्याचे राजहंस यांनी सांगितले. तमाशा ही कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न जरी लोक कलावंत करत असले तरी त्यांच्याच जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला असल्याचे वेळोवेळी दिसून येते. या कलावंतांच्या मुलांना शिक्षणासह समाजात पुन्हा पुनस्थापित करण्याच्या उदात्त हेतूने हा सेवाश्रम ही संस्था 2011 मध्ये सुरू झाली.आता या प्रकल्पात दहावी आणि त्यानंतरच्या उच्च शिक्षणासाठी वंचित-उपेक्षितांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली गेली आहे. यातील काही मुले आता स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत. या प्रकल्पात 2012 ला केवळ 15 मुले होती. नंतर 2022 मध्ये ती संख्या तब्बल 120 इतकी झाली. या ठिकाणी इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी पर्यंतचे मुले शिक्षण घेतात. त्यांचे पालन, पोषण आणि संगोपण केले जाते. यातील 25 मुले इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील आहेत तर उर्वरित 25 विद्यार्थी पाचवी ते दहावीपर्यंतचे असून 15 मुले दहावीच्या पुढील वर्गात आयटीआय व तत्सम शिक्षण घेत आहेत.

लवकरच 40 मुलींची स्वतंत्र निवासी व्यवस्था करणार

सेवाश्रम प्रकल्पात 20 मुलीचे पालन, पोषण आणि संगोपन केले जात आहे. लवकरच म्हणजे त्या जून पासून 40 मुलींची स्वतंत्र निवासी व्यवस्था या ठिकाणी केली जाणार आहे. यासाठी लोकसहभागातून जी मदत मिळत आहे त्यातून हे सारे काम केले जात आहे. आगामी काळातही हे काम करत राहून वंचित उपेक्षितांच्या मुलांसाठी कार्यरत राहणार असल्याची प्रतिक्रिया राजहंस दांपत्याने दिली.


Exit mobile version