Site icon Youth Ki Awaaz

बालविवाहाला धुडकावून लावून तिने घेतला शिक्षणाचा ध्यास!

सुशील देशमुख

बालविवाह ही एक जटिल समस्या बनली आहे. बालविवाहासाठी प्रोत्साहन देणारे समाजातील कोणी दूरचे लोक नसतात, तर घरचे लोकच बालविवाह लावून देताना दिसत असल्याचे वास्तव महाराष्ट्रात काही जिल्ह्यात दिसून येते. हे का घडते, यामागची काय कारणे आहेत, याचा उहापोह करण्यासाठी विविध यंत्रणा, एनजीओ आणि इतर काही घटक काम करतात मात्र हे सारे होत असताना आणि बालविवाह रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी अजुनही आजूबाजूला बालविवाह घडताना दिसतात. मात्र काही मुली या स्थितीत न डगमगता ओढवलेल्या अशा संकटातून जिद्दीने बाहेर पडतात अन् आपल्यावर बेतलेला हा प्रसंग इतर मुलींच्या वाट्याला येवू नये म्हणून त्यांच्यासाठी प्रेरणा बनतात. अशीच एक केसस्टडी नुकतीच समोर आली आहे.

‘ती’चं वय अवघं 11 वर्ष. ज्या वयात आई-वडिलांसमवेत आनंदात खेळायचं-बागडायचं. अगदी त्याच वयात घरातील गरिबी, दारिद्र्य अन् कोणाचा नसलेला आधार यामुळे तिचा बालविवाह लावून दिला जातो. आपल्या बाबतीत काय चाललयं याची कसलीच जाणीव तिला नसते. कारण बालविवाह लावून दिल्यानंतरही ‘ती’ ला ‘त्या’ च्या घरी ‘शहाणं’ होईपर्यंत पाठवलं गेलं नाही. पण जेव्हा ‘ती’ 13 वर्षांची झाली. तेव्हा मात्र नात्यातील व्यक्तीच तिला म्हणते. आता तुला नांदायला जायला पाहिजे… अन् इथचं सुरु होतो ‘ती’चा…. बालविवाहाला धुडकावून लावणारा संघर्षाचा प्रवास…..

महाराष्ट्रातीलच एका गावात एका चिमुकलीच्या बाबतीतील हा प्रसंग आहे.त्या मुलीचा वडिलांचा आधार तुटलेला – घरी आई आणि एक मोठा भाऊ. आई उपजिविका चालवण्यासाठी मिस्त्री काम करते तर भाऊ दुकानात काम करुन घरखर्चाला हातभार लावतो. दोन वर्षांपूर्वी तिच्या नातेवाईकाने तिचा एका 23 वर्षीय तरुणाशी विवाह लावून दिला; मात्र मुलीला सज्ञान होईपर्यंत त्याच्याकडे पाठवले जाणार नाही असे त्यांनी ठरवले होते. त्यामुळे मुलगी दोन वर्षानंतर घरी आईकडेच राहत होती, परंतु ती 13 वर्षांची झाल्यानंतर मुलीला तिच्या नात्यातील व्यक्ती म्हणाली की, तु आता तुझ्या पतीकडे नांदायला जा. या एका वाक्याने ती अल्पवयीन मुलगी सैरभैर झाली.

आपले लग्न इतक्या कमी वयात कसे केले? या आणि आता आपण हे सारे कसे निभवणार या प्रश्नांनी ती हतबल झाली. हा असला न कळत्या वयातील विवाह धुडकावून लावत तिने ही माहिती बालकल्याण समितीला दिली. नंतर समितीने गृह चौकशी अहवाल मागवून घेत लग्न करणार्‍या मुलाविरुध्द कार्यवाही केली. त्यानंतर मुलीच्या आईची समजूत काढत तिला बालविवाहाचे तोटे आणि आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम समजावून सांगत मुलीला शाळेत प्रवेश मिळवून दिला. आता ती मुलगी शाळेत शिक्षण घेत आहे. स्वत:वर ओढवलेल्या अशा संकटाला न घाबरता त्या मुलीने दाखवलेले धारिष्ठ हेच तिच्या जीवनाची दिशा अन् दशा बदलवणारे ठरले आहे.

रिझर्व्ह मॅरेजचे प्रकार

काही प्रकरणामध्ये बालविवाह नेमके कसे घडतात याची माहिती घेतली तर अनेक ठिकाणी मुलांमध्ये आपले लग्न होईल की नाही, ही असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याने अल्पवयीन आणि गरिब घरातील मुलगी हेरुन तिच्या कुटूंबाला आमिष दाखवत बालविवाह उरकला जातो. अशावेळी मुलगी सज्ञान होईपर्यंत तिला तिच्याच घरात ठेवले जाते.

गरिबी अन् असुरक्षिततेची भावना

घरची गरिबी, उत्पन्नाचे कायम स्वरुपी नसलेले स्त्रोत, शिक्षणाचा अभाव आणि काही घरात कर्ता पुरुष नसल्याने कुटूंबाचा घरगाडा ओढताना होणार्‍या हालअपेष्ठा. अशा सार्‍या स्थितीत मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याने तिचे घरातीलच लोक मुलीचा बालविवाह लावतात.एकंदरच मुलींनी आपल्या हक्कासाठी आणि आपल्यावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वत:हून पुढे येण्याची गरज आहे. या मुलीने योग्यवेळी घेतलेला निर्णय तिच्या भावी जीवनासाठी महत्वाचा ठरला.

सतकर्तेमुळे रोखले गेले बालविवाह

राज्य सरकार आणि त्यांच्या प्रशासकीय यंत्रणेकडून बालविवाह रोखण्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या असतात. मात्र हे सारे होत असतानाही ग्रामीण भागात बालविवाह लावले जातात. मात्र अशा स्थितीतही बालविवाह रोखण्यात आले आहेत.यासाठी मुलींना बालविवाहाला केलेले विरोध, सजग नातेवाईक, सामाजिक संस्था तसेच परिसरातील नागरिकांनी दाखवलेली सतर्कता कामी आलेली आहे. एकीकडे हे यश मानले जात असले तरी एक प्रश्न उपस्थित होतो आणि त्यावर सामाजिक जीवनातील प्रत्येकाने चिंतन केले पाहिजे.

अवैध गर्भपातही कारणीभूत

मुलींचे बालविवाह होण्यामागचे कारणे जसे सार्वत्रिक आहेत, तसेच एक कारण म्हणचे मागील 25 ते 30 वर्षांपूर्वी पुरोगामी महाराष्ट्रात ‘वंशाला दिवाच पाहिजे’ आणि ‘मुलगा हाच कुल दिपक’अशा ज्या मानसिकता तयार झाल्या.त्यातून गर्भ लिंग निदान करण्याचे प्रमाण वाढले. कायदा नंतर आला, तो असतानाही अवैध गर्भ लिंग निदान करण्याचे प्रकार घडले. त्यातूनच मुलीला जन्माअगोदरच संपवले गेले. अवैध गर्भपाताच्या या घटनांमुळे मागच्या काही वर्षात स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तराच्या प्रमाणात प्रचंड तफावत निर्माण झाली.त्याचे परिणाम आता दिसत असून त्यातून मुलांचे वय वाढल्यानंतर त्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. त्यातूनच अल्पवयीन मुलीसोबत ‘आरक्षित विवाह’ उरकला जात असल्याचे समोर येत आहे.

मानसिकता बदला

बालविवाहाच्या घटना माध्यमांमध्ये बातमीचा मुद्दा बनू नयेत तर हे प्रकार कायमस्वरुपी रोखण्यासाठी समाजाची मानसिकता कशी बदलता येईल यासाठी तज्ञांच्या समित्या स्थापन करुन त्यांच्याकडून मार्गदर्शन, प्रबोधन आणि त्या विषयांची व्यापक प्रसिध्दी व प्रचार होणे आवश्यक आहे. केवळ या विषयांचा प्रोपोगंडा काहीच साध्य होणार नाही. बालविवाहाचे चूकीचे परिणाम आधी पालकांना समजजावणे आवश्यक वाटते. अनेक संस्था यासाठी वाहून घेत काम करत असतानाही बालविवाह घडतात हे रोखण्यासाठी मुला-मुलीच्या पालकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.

शिक्षणासाठी शासकीय वसतीगृह

याबाबत प्रतिक्रिया देताना बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे म्हणाले, समाजात बालविवाह रोखणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणाच्या संधी मुलींना उपलब्ध करुन देणे पालकांचे कर्तव्य आहे. मुलींची सुरक्षितता आणि शिक्षणाच्या बाबतीत अडचण असल्यास शासनाच्या संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा. मुलींसाठी शासनाचे वसतीगृह आहेत.याठिकाणी मुलींचा निवास,शिक्षणाची सुविधा असते.त्याचा लाभ घ्यावा.

(Identity of the person is anonymity to protect their privacy) 

Exit mobile version