Site icon Youth Ki Awaaz

पत्रकारदिनी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे राज्यभर महत्त्वपूर्ण उपक्रम

प्रमुख कोअर टीमच्या उपस्थित राज्यातील कामाचा आढावानवीन वर्षी पत्रकारांचे घर, सामाजिक उपक्रम कार्यक्रमांचे आयोजन

नवीन वर्षात नवीन पदाधिकाऱ्यांची होणार निवड

मुंबई, ता. २७ : ६ जानेवारी या पत्रकार दिनाच्या निमित्ताने राज्यभरात आरोग्य शिबिर, पत्रकार पाल्यांचा सन्मान, जुन्या पत्रकारांचा सन्मान, पत्रकारांच्या मुलांना शैक्षणिक कीटचे वाटप, आरोग्य कार्डचे वाटप आदी भरगच्च उपक्रमांचे आयोजन राज्यभर सर्व विभाग, जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी दिली.

मुंबई येथे ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ राष्ट्रीय संघटनेची बैठक आयोजित केली होती. बैठकीला ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, कार्याध्यक्ष संजय आवटे, सरचिटणीस चंद्रमोहन पुपाला, उपाध्यक्ष मंदार फणसे, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर संघटनेची असलेली वाटचाल यावर सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी विचारविनिमय सर्वांसमोर ठेवला.

महाराष्ट्र राज्यात मागील वर्षी संघटनेने केलेले काम, आगामी वर्षात संघटनेची वाटचाल कशी असेल या संदर्भात प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी राज्य कोअर प्रमुख अनिल म्हस्के यांच्यासह योगेंद्र दोरकर राज्य कार्यध्यक्ष, अजितदादा कुंकूलोळ राज्य उपाध्यक्ष, बालाजी मारगुडे राज्य कार्यवाहक, यास्मिन शेख राज्य कार्यवाहक, चेतन कात्रे राज्य सरचिटणीस तथा शैक्षणिक सेल प्रमुख, विजय चोरडिया मराठवाडा विभागीय अध्यक्ष, मंगेश खाटीक विभागीय अध्यक्ष विदर्भ, दिगंबर महाले विभागीय अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र, अमर चोंदे मुख्य राज्य कार्यक्रम संयोजक, संजय पडोळे मुख्य राज्य कार्यक्रम संयोजक, अरुण ठोंबरे कोकण, मुंबई प्रमुख या कोअर टीम प्रमुखांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

संदीप काळे यांनी यावेळी सांगितले की, ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आता चौथा वर्षात पदार्पण करत आहे. चौथ्या वर्षात निवडणूक होऊन लोकशाही पद्धतीने देशाची आणि राज्याची नवीन कार्यकारिणी होईल. यामध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देत जुन्यांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. देशातल्या सर्व जिल्ह्यासह तालुक्यामध्ये ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ने मोठे काम उभे केले. आंतरराष्ट्रीय वाटचालीमध्ये पुढाकार घेत ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ आज एकोणीस देशांमध्ये पोहोचल्याचेही संदीप काळे यांनी सांगितले. रेणुका कड यांच्या माध्यमातून पत्रकारांसाठी रिसर्च सेंटर ही संकल्पना आपण पुढे आणत आहोत, असेही काळे म्हणाले.

अनिल म्हस्के यांनी यावेळी सांगितले, महाराष्ट्र राज्यात पत्रकार दिन साजरा करताना चार ते दहा जानेवारी २०२४ या कालावधीत प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवर आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील, तालुक्यातील दहा उत्कृष्ट पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासह संघटनेमध्ये चांगले काम करणाऱ्या निवृत्त झालेल्या किंवा ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. ज्या पत्रकारांच्या मुलांनी विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळविले आहे, अशा पाच मुलांचा त्यांच्या आई-वडिलांचा कार्यक्रमांमध्ये सन्मान करण्यात येणार आहे.

कोअर टीमच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनिल म्हस्के आणि राज्यभरामध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा आराखडा सर्वांसमोर ठेवला. ज्या ज्या जिल्ह्यात अद्यापही संघटनात्मक बांधणी होऊनही मोठे काम उभे राहत नाही, तिथे काम उभे करण्यासंदर्भात पुढाकार घ्या, असे आवाहन यावेळी म्हस्के यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

………………………

पत्रकार गृहनिर्माण सोसायटी, सामाजिक उपक्रमांचे आयोजन.

यावेळी मस्के यांनी सांगितले की, राज्यभरामध्ये पत्रकारितेमध्ये सक्रिय असणाऱ्या 85 टक्के पत्रकारांच्या घरांचा विषय आजही गंभीर आहे. या घर नसलेल्या पत्रकारांच्या घरासाठी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ पुढाकार घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शंभर पत्रकारांच्या घरांचा प्रोजेक्ट उभा करत आहे. याची सुरुवात चंद्रपूर, बुलढाणा, हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये पत्रकार गृहनिर्माण सोसायटीचा शुभारंभ फेब्रुवारी महिन्यामध्ये आयोजित करण्यात आला आहे. पत्रकारांच्या मुलांचे शिक्षण, पत्रकारांचे त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य या अनुषंगाने राज्यभरात अनेक उपक्रम राबवायचे आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबवायचे आहेत. कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेला निधी शिक्षणासाठी, आरोग्यासाठी अडचणीच्या काळात मदत म्हणून वापरण्यात येणार आहे. सामाजिक उपक्रमाची सुरुवात बुलढाणा येथून 3 मार्चला होणार आहे, असे अनिल म्हस्के यांनी सांगितले.

……………………

Exit mobile version