Site icon Youth Ki Awaaz

#JNU… (hindi)

जे एन यू
लेखक:Govinda shekhar swami
(sunday, 24/11/2019 – 15:59)
    JNUमधले विद्यार्थी अभ्यास बिभ्यास सोडून (करदात्यांच्या पैशांवर मजा मारत) नसते धंदे करत बसतात, अशी वक्तव्यं गेले काही दिवस ऐकू येत आहेत. रोहित वेमुला प्रकरणाविषयी लिहितानाही मी म्हटलं होतं, की कुठल्याच विद्यार्थी चळवळीत किंवा संघटनेत अभ्यास सोडून राजकारण करणं कधीच अपेक्षित नसतं. JNUतल्या राजकारणातही ‘लडाई पढाई साथ साथ’ हे ब्रीदवाक्य अनेक ठिकाणी ऐकू येतं. JNUतल्या महत्त्वाच्या विद्याथी नेत्यांची शैक्षणिक, संशोधन क्षेत्रातली कामगिरी नेहमी उत्तम असते. त्यामुळे हे विद्यार्थी आपापला अभ्यास, संशोधन सांभाळूनच बाकीचे ‘धंदे’ करत असतात, हे एक. दुसरं म्हणजे, जो विद्यार्थी (करदात्याच्या पैशांनी) उच्च शिक्षण घेतो, त्याचं समाजाप्रति ऋण असतं असं मान्य केलं तर JNUचे विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे या ऋणाची परतफेड करतात, असं म्हणता येईल. कारण उच्च शिक्षण म्हणजे केवळ आपल्या क्षेत्रातलं तांत्रिक ज्ञान झापडं लावून गिळणं नाही. आपल्या राजकारणाद्वारे अधिक चांगला समाज निर्माण करण्याचे प्रयत्न हे विद्यार्थी करत असतात. JNUतल्या राजकीयदृष्ट्या सजग वातावरणामुळे तिथला एकंदर समाज/ समुदाय (JNUतल्या राजकारणाशी, विद्यार्थी संघटनांशी काहीच घेणंदेणं नसलेले विद्यार्थीही यात आले) अनेक बाबतीत अनेक अंशांनी सजग, संवेदनशील, विचारी, सुसंस्कृत होतो असं मी ठामपणे सांगू शकते. त्याची काही उदाहरणं देते.
JNUत शिकायला मोठ्या प्रमाणावर परदेशी विद्यार्थी येतात. फॉरेन स्टुडंट्स असोसिएशनच्या पुढाकाराने JNUत कँपसमधल्या (बांधकामांवर काम करणार्‍या वगैरे) मजुरांच्या मुलांसाठी बालवाड्या-सदृश वर्ग चालवले जातात. JNUतले देशी/परदेशी विद्यार्थी तिथे (अर्थातच विनामोबदला) शिकवायला जातात. (निदान मी तिथे असताना तरी हे वर्ग शनिवार-रविवार नियमित चालत.)
देशाच्या मागास भागांतल्या, बर्‍या शाळांत शिक्षण न मिळालेल्या, इंग्रजीला घाबरणार्‍या अनेक विद्यार्थ्यांना JNUत प्रवेश मिळवण्याची इच्छा असते. त्यांना प्रवेश परीक्षेविषयीचं मार्गदर्शन करणारे वर्ग गेली अनेक वर्षं उन्हाळी सुट्टीत JNUच्या विद्यार्थी संघातर्फे भरवले जातात. यात JNUतलेच सिनिअर विद्यार्थी (अर्थातच विनामोबदला) शिकवतात.
JNU ही भारतातली एक उत्कृष्ट शैक्षणिक संस्था आहे. तिथल्या शैक्षणिक वातावरणाची झलक म्हणून तिथली लायब्ररी पहावी!
JNUचं पुस्तकालय नऊ मजली आहे. तिथे भरपूर वाचन कक्ष आहेत. तरीही, सकाळी ते उघडायच्या वेळी घाईघाईने जाऊन जागा पकडली नाही, तर नंतर चांगली जागा मिळवण्याची पंचाईत होते. परीक्षा जवळ आल्या की पुस्तकालय रात्री बारा बाजेपर्यंत उघडं असतं, आणि रात्री बेल वाजवू वाजवू लोकांना बाहेर काढावं लागतं. (लायब्ररी विद्यार्थ्यांची इतकी आवडती असण्याच्या कारणांत ‘एसी’ आणि ‘वायफाय’ ही कारणंही आहेत अर्थात.)
भारतीय सनदी सेवांची परीक्षा देणार्‍या उमेदवारांचं दिल्ली हे आवडतं ठिकाण आहे. JNU ही या उमेदवारांचं लाडकं आहे. इतकं, की JNUच्या वाचनालयातल्या एका हॉलचं नावच गमतीन धोलपूर हाऊस असं पडलं आहे. (कारण युपिएससीचं दिल्लीतलं कार्यालय धोलपूर हाऊस या इमारतीत आहे.) JNUमध्ये काही या परीक्षेसाठीचं विशेष प्रशिक्षण मिळत नाही. पण एकंदरीत शिक्षणाचा उच्च दर्जा, परीक्षेसाठी तयारी करणारे इतर अनेक विद्यार्थी अवतीभवती असल्याने एकमेकांना मदत, मार्गदर्शन, चर्चा, आणि तासंतास/ रात्रंदिवस अभ्यास करण्यासाठी आवश्यक त्या सुविधा JNUत मिळतात. JNUतलं हे ‘धोलपूर हाऊस’ अगदी कायम, २४ तास उघडं असतं. बाहेर कायम गार्ड असल्याने सुरक्षित. टेबले, खुर्च्या, दिवे, पंखे, बाथरुम अशा बेसिक सोयींनी युक्त असलेल्या या हॉलमध्ये (विशेषतः सनदी सेवा परीक्षा देणारे) विद्यार्थी कायम अभ्यासासाठी ठाण मांडून असतात. रात्री उशिरापर्यंत तिथे अभ्यास करून, थोडी तिथेच डुलकी काढून, तिथेच दात घासून तिथूनच सकाळच्या लेक्चरला जाणारे विद्यार्थी तिथे भरपूर दिसतात. तिथे बसायला जागा मिळवण्यासाठी संगीत खुर्ची खेळावी लागते. युपिएससीचा निकाल हा जेएनयूत विशेष आनंदाचा दिवस असतो. कुठल्या होस्टेलमधून यावर्षी सगळ्यात जास्त जण पास झाले अशी स्पर्धा असते. सनदी अधिकारी हे फक्त उदाहरण. बाकी अनेक क्षेत्रांत JNUचे विद्यार्थी कशी चांगली कामगिरी करत आहेत वगैरे सांगत बसत नाही.
आपल्या कराच्या पैशांचं वाट्टोळं JNUचे विद्यार्थी करतात, असं वाटणारे नागरिक हे वाचून किंचित तरी आश्वस्त होतील अशी केवळ आशाच करू शकते. कारण झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं जागं करणार?…..
Exit mobile version